हा गंगा यमुनेच्या संगमाप्रमाणे-गाथामूर्ती गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत
नेवासा(प्रतिनिधी)
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिर प्रांगणात सदगुरू जोग महाराज यांचा निर्याण शताब्दी व गुरुवर्य बन्सी महाराजांचा २५ वा पुण्यतिथी महोत्सव हा गंगा यमुनेच्या संगमाप्रमाणे असल्याचे गौरवोदगार गंगापूर येथील विठ्ठल आश्रमाचे प्रमुख गाथामूर्ती गुरुवर्य हरिभक्त परायण रामभाऊ महाराज राऊत यांनी काढले.चित्त शुद्धानेच ब्रम्ह ज्ञानाची खरी प्राप्ती होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात स्वानंद सुखनिवाशी सदगुरू जोग महाराज यांच्या निर्याण शताब्दी व वैकुंठवाशी गुरुवर्य बन्सी महाराज तांबे यांच्या २५ व्या पुण्यतिथी महोत्सवात शुक्रवारी झालेल्या कीर्तन मालेतील सहावे पुष्प गुंफतांना हभप रामभाऊ महाराज राऊत हे बोलत होते.
यावेळी बोलतांना गाथामूर्ती हरिभक्त परायण रामभाऊ महाराज म्हणाले की ज्ञानाची जोड सत्कर्म करतांना आवश्यक असून कर्माचे स्वातंत्र फक्त मानव देहामध्ये आहे,मानव देहात येऊन जो उध्दार करतो भाग्यवान जो उध्दार करत नाही त्याचे जीवन पशुसमान असल्याचे त्यांनी सांगितले.गाड्या व बंगले घेण्यात आयुष्याचे वाटोळे करू नका,राहिलेल्या आयुष्याचा विनियोग याच देहामध्ये करा,ही संधी पुन्हा नाही खरी मुक्ती ही ज्ञानानेच मिळते व मोक्षाची प्राप्तीही ब्रम्हज्ञानानेच होते असे ही प्रबोधन त्यांनी यावेळी बोलतांना केले.जगात ज्याने ब्रम्हज्ञान प्राप्त केले तोच खरा सुखी आहे.ब्रम्ह ज्ञान प्राप्तीसाठी शुद्ध अंतकरणाने व विचाराने प्राप्ती होते प्रत्येक साधकाला अधिकारी असावाच लागतो ब्रम्हज्ञानासाठी मलविक्षेपाची निवृत्ती लागते,कीर्तनात पांडुरंगाचे वर्णन सोडून व्यक्ती वर्णन व दुसऱ्याचे वर्णन करणे घातक असल्याचे त्यांनी सांगितले स्तुती ऐकणे आत्महत्या करण्यासारखे आहे स्तुती करणारा हा हत्या करणारा आहे.
यावेळी सोहळयाचे मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हभप शिवाजी महाराज देशमुख,संस्थानचे अध्यक्ष माधवराव दरंदले,रामायणाचार्य हभप बाळकृष्ण महाराज सुडके,विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे,गोविंदराव शेटे, कैलास जाधव,कृष्णा पिसोटे,रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात,प्राचार्य डॉ.अशोक शिंदे,रविंद्र मुनोत,जयंत देवचक्के,रामनाथ महाराज पवार,मृदुंगाचार्य गिरीजानाथ महाराज जाधव,कृष्णा महाराज हारदे,संत सेवक गजानन जगताप,बदामराव पठाडे,लक्ष्मण महाराज नांगरे यांच्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment