पॅसेंजर गाड्या २६ डिसेंबर पर्यंत बंदच रहाणार.
शुभम एन.जठार - विसापूर
नेहमी प्रमाणे रेल्वे प्रशासनाने दौंड-मनमाड दरम्यान धावणाऱ्या शिर्डी फास्ट पॅसेंजरसह सहा पॅसेंजर गाड्या १६ जूनपासून २६ सप्टेंबर बंद केल्या होत्या.मात्र डेडलाईन संपली तरीही पॅसेंजर गाड्या चालू झाल्या नाहीत.नुकताच रेल्वे प्रशासनाने पुन्हा आदेश काढून २६ डिसेंबर पर्यंत तीन महीने या गाडया बंद रहाणार असल्याचे जाहीर केले आहे.तशा प्रकारच्या सुचना विसापूरसह इतर रेल्वे स्थानकांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आल्या आहेत.
मागील दोन वर्षांत टप्प्या टप्प्याने सतत पॅसेंजर गाड्या बंद करण्यात येत आहेत.गेल्या तिने महिन्यांपासून मात्र शिर्डी- सीएसटी मुंबई फास्ट पॅसेंजरही बंद करण्यात आली आहे.या बंद गाडयात साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजरला कात्री लावण्यात आल्याने साई भक्तांना त्रास सहन करावा लागणार आहे.रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांचे नोटीस बोर्डवर लावलेले आदेशानुसार दौंड-नांदेड, पुणे-निजामाबाद,मुंबई-शिर्डी डाउन व नांदेड-दौंड, निजामाबाद-पुणे, शिर्डी- मुंबई या अप गाड्या २६ डिसेंबर पर्यंत बंद रहाणार आहेत.पॅसेंजर गाड्या म्हणजे गरीबांचा रथ समजला जातो.त्याच गाड्यांवर रेल्वे कडून रेल्वे लाईन दुरुस्ती करण्याच्या नावाखाली वारंवार बंदचे हत्यार चालवले जात आहे.सतत पॅसेंजर गाड्या बंद राहील्याने सामान्य प्रवासी रेल्वे प्रवासापसुन दुरावत चालला आहे.दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर दिवसा एकही पॅसेंजर गाडी नसल्याने विसापुर,बेलवंडी,श्रीगोंदा, काष्टी,सारोळा, आकोळनेर या सारखी स्थानके ओस पडली आहेत.प्रवाशीही पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची चौकशी करून वैतागले आहेत.दौड-मनमाड मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके केवळ क्राॅसिंग स्टेशन बनली आहेत.
मागील वर्षी दसरा व दिपावली या काळात इतर वेळी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या चालू केल्या होत्या.दिपावलीचे काळात अनेक चाकरमान्यांना सुट्टया असतात.बाहेर गावी रोजगारा साठी गेलेले लोक गावाकडे येऊन सण साजरा करतात.ऐन दिपावलीचे काळातही पॅसेंजर गाड्या बंद ठेवण्याचे रेल्वे प्रशासनानाचे धोरण अतिशय अयोग्य आहे.त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

Post a Comment