रोहित पवारांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची खेळी
सत्तार शेख | जामखेड
कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात यंदा होणारी विधानसभेची निवडणूक राज्यातील सर्वात हेवीवेट लढत ठरणार आहे. या मतदारसंघातून शरद पवारांचे नातू रोहित पवार हे मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत.संपुर्ण राज्याचे लक्ष येथील लढतीकडे असणार आहे.तीन किंवा चार ऑक्टोबर रोजी कर्जत शहरात राम शिंदे यांच्या उमेदवारीचा अर्ज भरला जाणार आहे. रोहित पवारांना शह देण्यासाठी भाजपाकडून माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या रोड शो सह जाहीर सभेचे आयोजन करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून समोर येत आहे.
राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत -जामखेड विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे नातू रोहित पवार असा संघर्ष होणार आहे. दोघा उमेदवारांसाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्वाची आहे. राज्याच्या राजकारणात थेट मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकार्याचा पराभव करून दणदणीत एन्ट्री करण्यासाठी रोहित पवार सरसावले आहेत तर राज्याच्या राजकारणातील बलाढ्य पवार घराण्याशी दोन हात करून पवार घराण्याला धोबी पछाड देऊन राज्याच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवण्याची संधी साधण्याबरोबरच पक्षात वजन वाढवण्यासाठी राम शिंदे आसुलेले आहेत. दोन्ही उमेदवारांनी संपर्क अभियानासह वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे मतदारसंघ ढवळून काढला आहे. दोन्ही उमेदवारांनी जाहिरसभांमधून ऐकमेकांचे वाभाडे काढत मतदारसंघांचे राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.
ऐरवी राम शिंदे यांच्यासाठी 2019 ची विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार असे चित्र असतानाच अचानक लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रोहित पवारांनी मतदारसंघात लक्ष घालत मतदारसंघात जोरदार जनसंपर्क हाती घेत राम शिंदे यांच्या समोर तगडे अवाहन उभे करत एकतर्फी ठरणारी विधानसभा निवडणूक आता अतिशय अतितटीच्या वळणावर आली आहे. मतदारसंघात जोरदार संघर्ष पेटला आहे. फोडाफोडीने वेग घेतला आहे. या संघर्षाच्या वळणावर राम शिंदेंच्या मदतीसाठी सातार्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघात धाडून मतदारसंघाचा माहौल बदलवण्याची खेळी मुख्यमंत्र्यांकडून खेळली जाणार आहे.उदयनराजे भोसले यांची राज्यातील तरूणाईमध्ये मोठी लोकप्रियता आहे ही लोकप्रियता कॅश करण्यासाठी येत्या 3 किंवा 4 रोजी उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
उदयनराजे भोसले खरोखर येणार का ?
राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी मागिल आठवड्यात डॅडीनंतर सर्वाधिक जिव शरद पवार साहेबांनी लावल्याचे जाहिरपणे सांगत शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. पवार घराण्याशी उदयनराजेंचे असलेले घनिष्ट संबंध पाहता उदयनराजे शरद पवारांच्या नातवाविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी खरोखरीच कर्जतच्या सभेला उपस्थिती लावणार का ? याबाबत राजकीय वर्तुळातून साशंकता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment