नेवासा (प्रतिनिधी)
जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध अॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सहकारी, अशा दोघांची नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती गाव येथे निघृण हत्या झाली आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी शरद शिवाजी ताके यांस अटक केली आहे. कुऱ्हाड जप्त केली आहे.
अॅड. संभाजी ताके हे पत्नी आणि दोन मुलांसह भिंगार शहरानजीक असलेल्या नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील सौरभनगर कॉलनी येथे राहतात. अॅड. ताके यांचे जेऊर हैबती हे मूळ आहे. ते आज गावाकडे काही कामानिमित्त गेले होते. तेथे त्यांच्या जमिनीचे वाद असून, ते प्रकरण नेवासे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.अॅड. ताके यांच्याबरोबर अॅड. ताके यांचे सहकारी संतोष सुंदरलाल गुणे (33, रा. बहिरवाडी, ता. नेवासा) याचा देखील खून झाला आहे.घटनास्थळी मोटारगाडी आढळल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले.घटनास्थळाचा पंचनामा नेवासे पोलिसांकडून सुरू आहे. अॅड. ताके यांच्या हत्येची माहिती नगरसह भिंगार शहरात वार्यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे. नगर आणि भिंगारमधील ताके यांच्या मित्रपरिवाराने नेवाशाकडे धाव घेतली आहे.गुणे याच्याविरूध्द तळेगाव दाभाडे आणि कराड येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

Post a Comment