ऐन दुष्काळात पाणी साठवण टाकीच्या दुरूस्तीचा मुहर्त

जामखेड नगरपरिषदेचा संवेदनशील कारभार : पाणी प्रश्नाचा उडाला बट्ट्याबोळ; पाण्यासाठी जनतेचा टाहो 

जामखेड | प्रतिनिधी 
यंदाच्या भीषण दुष्काळामुळे आधीच जामखेडकर जनता पाणी टंचाईच्या भीषण संकटाशी झुंज देऊन हैराण झालेली असताना ऐन टंचाईच्या काळात शहराला पाणी पुरवठा करणार्या नळ पाणी पुरवठा योजनेतील तीन साठवण टाक्यांपैकी एका टाकीची नगरपरिषदेने दुरूस्ती हाती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून दोनच टाक्यांमध्ये टँकरद्वारे येणारे पाणी साठवले जात आहे. नगरपरिषदेच्या आडमुठेपणामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा पुरता बट्ट्याबोळ उडाला आहे.शहरातील अनेक भागात 30 ते 35 दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागला आहे. नगर परिषदेचे अधिकारी पाणी प्रश्नांवर गंभीर नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. 

जामखेड शहराला पाणी पुरवठा करणार्या योजनेतील तीन जल साठवण टाक्यांपैकी साडे तीन लाख लीटर क्षमतेच्या एका मोठ्या पाण्याच्या टाकीच्या दुरूस्तीच्या नावाखाली नगरपरिषदेने मागील पंधरा ते वीस दिवसांपासून या टाकीत पाणी साठवणे बंद केले होते याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. आता शहरातील काही भागात 30 ते 35 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. एकिकडे शहर पाणी टंचाईच्या संकटाशी दोन हात करत असताना पाण्याच्या टाकीची दुरूस्तीचे काम हाती घेण्याची आयडिया नगरपरिषदेच्या कोणत्या अधिकारी अथवा कर्मचार्याच्या संवेदनशील सुपिक डोक्यातून ऐन निवडणूकीच्या तोंडावर लढवली गेली याबाबत शहरात उलट सुलट चर्चा होण्याबरोबरच नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

जामखेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 23 टँकरद्वारे 46 खेपा मंजुर आहेत. टँकरद्वारे मिळणारे पाणी जामखेड नगरपरिषदेच्या तीन टाक्यांमध्ये संकलित करून ते शहराला पुरवले जाते. जामखेड नगर परिषदेने टाक्यांमध्ये पाणी भरण्यासाठी एक छोटा शेततलाव खोदला आहे या तलावात टँकरचे पाणी टाकले जाते. तलावात जमणारे पाणी मोटारीद्वारे पाण्याच्या टाकीत सोडले जाते. छोटा तलाव भरण्यासाठी तसेच तो उपसण्यासाठी बराच वेळ जात असल्याने टँकर खोळंबून राहत आहेत. याशिवाय विजेची वारंवार समस्या उद्भवत आहे यामुळे टाकी भरण्यासाठी वेळ लागत आहे. याचा थेट परिणाम टँकरच्या खेपांवर होत आहे. 


Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget