पेन्शनरला महागाई भत्ता व मेडिकल भत्ता दिला नाही तर इच्छा मरणाला परवानगी द्या - कॉ बाबा आरगडे
नेवासा, (प्रतिनिधी)
नेवासा तालुका पेन्शनर संघटनेच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी नेवासा तहसील कार्यालयावर मंगळवारी दि.५ नोव्हेंबर रोजी मोर्चा नेण्यात आला.नेवासा पेन्शनरला महागाई भत्ता व मेडिकल भत्ता द्या नाहीतर इच्छा मरणाला परवानगी द्या असे भावनिक आवाहन कामगार नेते कॉ.बाबा आरगडे यांनी यावेळी बोलताना केले.
नेवासा तहसीलवर काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व कामगार नेते कॉ. बाबा आरगडे,अहमदनगर जिल्हा पेन्शनर संघटनेचे सचिव उदयकुमार बल्लाळ नेवासा तालुका पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष बापूराव बहिरट यांनी केले. नेवासा तालुक्यातील ईपीएस ९५ पेन्शनरला पेन्शन वाढ मिळाली पाहिजे,पेन्शनरला महागाई भत्ता व मेडिकल भत्ता मिळाला पाहिजे,किमान ७,५०० इतकी पेन्शन देण्यात यावी,पेन्शन सोबत महागाई भत्ता देण्यात यावा
पेन्शनर व त्याच्या पत्नीस मोफत वैद्यकीय सेवा मिळावी,सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार उच्च पेन्शनरला पात्र झालेल्या पेन्शनरला उच्च पेन्शन मिळावी या मुख्य मागण्यांसह यावेळी मांडण्यात आल्या.
कॉ.बाबा आरगडे यांनी पेन्शनरची व्यथा आपल्या भाषणातून विषद करतांना पेन्शनरला महागाई भत्ता व मेडिकल भत्ता देता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी तरी द्या अशा भावना व्यक्त करत इच्छा मरणासाठी पेन्शनरच्या वतीने निवेदन तयार करण्यात येईल असे सांगून सरकारचे पेन्शनरच्या मागण्यांचा विचार करावा असे आवाहन केले.
यावेळी पेन्शनर संघटनेचे उपाध्यक्ष विनायक लोळगे, सचिव ज्ञानेश्वर टेकाळे,सहसचिव सुभाष दाणी,वसंतराव डावखर,प्रभाकर बोरकर,प्रकाश कुटे,रमेश ढगे,एकनाथ मुळे,किशोर शिंदे,नानासाहेब भागवत,मच्छिंद्र आगळे यांच्यासह विविध खात्यामध्ये नोकरी केलेले पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.नायब तहसिलदार नारायण कोरडे यांनी पेन्शनरांचे निवेदन स्वीकारले.
Post a Comment