पाच लाखांचे नुकसान
चांदेकसारे ( वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथील विक्रम मधुकर गुरसळ यांची 50 फुट विहिर अतिवृष्टीच्या पावसामुळे कड्यासह बुजून गेली यात त्यांचे जवळपास पाच लाखाचे नुकसान झाले.
डाऊच खुर्द गावठाण रस्त्यालगत विक्रम गुरसळ यांनी आपल्या सर्वे नंबर 63 मध्ये आपली दोन एकर शेती व वस्तीवरील दोन एकर या विहिरीच्या पाण्याने बागायती होईल या दृष्टीने विहीर खोदली होती. 35 फूट कॉंक्रिटीकरण असलेले कडे व 50 फूट विहीर असा जवळपास एकूण पाच लाख रुपये खर्च त्यांना या विहिरीसाठी आला होता.मात्र दुर्दैवाने गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाने ही विहीरच पूर्ण खचून गेली. जमिनीपासून वर असलेले तीन फुट कडे 35 फुटासह जमिनीत गाडली गेली. विहिरीवर पाणी उपसा साठी बसवलेली विद्युत मोटरही यात गाडली गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळ गुरसळ यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी विक्रम गुरसळ ,मधुकर गुरसळ व नानासाहेब गुरसळ यांना बोलावून घेतले.आपली चार एकर बागायत संभाळणारी विहीर आता पुर्णपणे नेस्तनाबूत झाली असल्याने विक्रम गुरसळ पुरते हवालदिल झाले . सदर विहिरीचा पंचनामा महसूल व कृषी विभागाकडून व्हावा व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गुरसळ यांनी केली आहे.गेल्या आठवड्यातही गोदावरी नदीच्या बाजूला असलेली डाऊच खुर्द येथील बाळासाहेब बापूराव गुरसळ यांचीही अर्धी विहीर या अतिवृष्टीच्या पावसाने ढासळून गेली आहे.
सदर परिसरात सोयाबीन व मका पिकाचा नुकसानीचा पंचनामा चालू आहे महसूल विभागाने या पडलेल्या विहिरीचांही पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Post a Comment