विसापूर
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जलाशयात शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदीवासी मच्छीमार युवकाचा मृत्यू झाला.
दरम्यान सुभाष बापु घोलवड(वय वर्षे ३२) हा मासे पकडण्यासाठी विसापूर धरणात गेला होता.पिंपळगाव पिसा हद्दीत आठाचामळा शिवारात चौधरी यांच्या विहीरीजवळ ही घटना घडली.ज्या ठिकाणी सुभाष घोलवड हा युवक गेला होता.त्याठिकाणी विद्युत वाहिन्या व विद्युत मोटारींचे जाळे तयार झालेले आहे.विसापुर धरण ओव्हरफ्लो होत आल्याने चौधरी यांच्या विहीरीसह काही केबल व विजेचे पोल तर थेट धरणाच्या पाण्यात गेले आहेत.सुभाष घोलवड हा युवक शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास ज्या वेळी मासे पकडण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला त्यावेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरला होता.त्याला विजेचा झटका बसल्यावर तो तडफडत जागीच मृत्यु होऊन पाण्यात बुडाला.त्यावेळी धरणाच्या कडेला त्याची लहान असलेले दोन मुले व एक मुलगी उभे होते.आपला बाप आपल्या डोळ्यासमोर पाण्यात तडफडत असल्याचे पाहून त्यांनी आरडाओरडा केला.तेथुन जवळच रहात असलेल्या मच्छीमार बांधवांनी त्याठिकाणी धाव घेतली.विद्युत प्रवाह खंडित करुन त्याचा मृतदेह बाहेर काढला.या बाबत संतोष शंकर पवार यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.घरातील करता तरुण व्यक्ति गेल्याने त्याची पत्नी व तीन लहान मुलांना कोणताही आधार उरला नाही.पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी घटना स्थळी भेट देऊन पहाणी केली पुढील तपास सहायक उपनिरीक्षक बजरंग गवळी करत आहेत.विसापूर धरणाच्या कडेला मच्छीमार भिल्ल समाजातील दहा बारा कुटुंब रहातात.ते सर्व भूमीहीन आहेत.उपजीविका करण्यासाठी मजुरी करुन कधीमधी मच्छीमारी करून जीवन जगणे हा त्यांचा दिनक्रम आहे.स्वतःची जागा नसल्याने त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरे मिळण्यास अडचण येत आहे.त्यामुळे शासनाने त्यांना जागा उपलब्ध करून घरे बांधून देण्याची गरज आहे.


Post a Comment